मी अनुभवलेला धर्म

*मी अनुभवलेला धर्म *
(शब्दांकन :-राम देशमुख पार्डीकर)
मी गेल्या वर्षी गडकोट मोहीमेसाठी गेलो होतो.
जाताना धर्माच्या घोषणा देत, जयजयकार करत गेलो होतो. मनात आपल्याच धर्माचा उन्माद टचटचून भरला होता. बरोबर मित्र होतेच.
पुण्याजवळ रात्री मुक्काम होता, आम्ही उघड्यावरच झोपलो होतो.
काही मित्रांना थंडी सोसवत नव्हती. ते एका इमारतीच्या
आडोश्याला झोपण्यासाठी गेले पण त्या इमारतीतल्या
सुशिक्षित व स्वधर्मीय लोकांनी त्यांना हाकलून लावले.
दुस-या दिवशी परत आमची पायपीट सूरू झाली. दुसरा मुक्काम सिंहगडाच्या आणि रायगडाच्या मध्ये असणा-या एका जंगलात पडला, आदिवासी पाड्यात आम्ही थांबलो होतो.
एका आदिवासी बांधवाने चक्क आम्हाला झोपडीत जागा दिली.
झोपडी छोटीशीच पण त्याचे मन आभाळसारखे वाटले. त्याच्या त्या झोपडीसमोर कालचा बंगला खुपच खुजा वाटत होता.
चालून चालून थकलो होतो, सकाळपासून चालत होतो. तहान खूप लागली होती, जवळ पाणी नव्हते.
त्या बांधवाकडे पाणी मागितले पण पाणी थोडे अन आम्ही 25 जन, शेवटी त्या सदगृहस्थाने आमच्यासाठी रात्रीचे पाणी आणून दिले.
पाणी दरीतून आणावे लागत होते, त्यात मटका छोटाच पण तरीही तो माणूस हेलपाटे
मारत होता.
अखेर मी त्या सदगृहस्थास म्हंटले, ” मामा राहू द्या, नका त्रास घेवू “.
यावर तो आदिवासी म्हणाला “बाळा माझ्या दारात तू परत कशाला येशील ? माझा तेवढाच धर्म “.
तो जे बोलला ते अविस्मरणीय होते, त्याच्या त्या वाक्याने माझ्या डोक्यातला धर्माचा माज, उन्माद झटक्यात उतरला.
रात्र भर झोप लागली नाही. मन स्वताला प्रश्न विचारत होते, अस्वस्थ होतो. हा
आदीवासी म्हणतो तो धर्म कोणता?
आम्ही ज्याच्या घोषणा
देतोय तो कोणता ? काल बंगल्याच्या आडोश्याला झोपल्यावर हाकलून देणा-याचा धर्म कोणता ?
मन प्रश्नांनी भरून गेले होते.
नक्की खरा धर्म कोणता ? आम्ही ज्याचा जयजयकार करत होतो तो की आदिवासी म्हणतो तो?
जशी रात्र उतरत होती तसा
मनातला धर्माचा माज उतरत होता. मन शांत होत होते. त्या
दिवशी खरा धर्म गवसला होता.
हातातली पोळी कुत्र्याने
पळवल्यावर त्या कुत्र्याच्या मागे तुपाची वाटी घेवून पळणारे संत नामदेव आणि तो आदिवासी दोघे सारखेेच वाटत होते.
कुत्र्यात देव शोधणारे नामदेव अन माणसात धर्म शोधणारा तो आदिवासी सारखेच भासत होते. ठार अडाणी असणारा आदिवासी धर्म जगत होता.
आम्ही केवळ घोषणा देत होतो. आमचे मस्तक दुस-या
धर्माविषयी तिरस्काराने भरले होते. मस्तकातला धार्मिक उन्माद दुस-या धर्माच्या माणसाला माणूस मानायला तयार नव्हता ते शत्रू वाटत होते पण त्या माणसाने डोळ्यावरची झापडं काढली.
त्याने धर्म शिकवला. धर्म अनुभवला. एका आदिवासी माणसाला जे कळते ते आम्हाला कळत नाही. स्वतालाच स्वताची लाज
वाटली. तो माणूस आजही तसाच डोळ्यासमोर दिसतो. दगडू कचरे त्याचे नांव.
तिथून निघताना त्याच्या पायाला स्पर्श केला खूप
काहीतरी गवसल्याचा आनंद मनात दाटला होता.

माणसाला माणसाचे शत्रू बनवणारा, परस्पराच्या जीवावर उठणारा कोणताही धर्म, धर्म असू शकतो काय ?

शहरी ढोंगि माणसा माणुस महणुन विचार कर.

आधी काळजात रेंज पाहीजे

आधी काळजात रेंज पाहीजे …

तेच तेच जगणं
तेच तेच जिवन
रोज रोज तेच
सारख सारख जेवण.
आयुष्यात कधी कधी थोडातरी
चेंज पाहिजे,
ऐकमेकांशी बोलता येते पण आधी
काळजात रेंज पाहीजे…..

भाऊ भाऊ दुर झाले
आईबापाच ओझं झालं,
अर्ध अंगण तुझ अन्
अर्ध अंगण माझ झालं.
थोडतरी काळजात आपुलकिचं
कव्हरेज पाहीजे,
ऐकमेकांशी बोलता येते पण आधी
काळजात रेंज पाहीजे….

हल्ली घरातल्या घरात
अंगत पंगत बसत नाही
आपुलकी प्रेम जिव्हाळा
दुरदुर दिसत नाही.
घराघरात प्रत्येकाला
आयुष्य अँरेंज पाहीजे,
ऐकमेकांशी बोलता येते पण आधी
काळजात रेंज पाहीजे….

ऐकमेकांचं सुखदुःख
ऐकमेकांनीच वाटायचं
आपुलकीनं मायेनं
ऐकमेकांना भेटायचं.
एकत्र पंगतीत जेवतांनाही
शेतातलं ताजे व्हेज पाहिजे,
ऐकमेकांशी बोलता येते पण आधी
काळजात रेंज पाहिजे !!

Marathi poem

आर्थिक स्टॅबिलिटी मिळवताना
बरच गणित चुकत जातं,
नसण्यातच आनंद असतो
शेवटी उत्तर हाती येतं…

लहानपणी शाळेमध्ये
एकच ‘पोशाख’ असायचा
खाकी चड्डी पांढरा सदरा
प्रत्येकाच्या अंगावर दिसायचा…

पायात चप्पल असणं
ही लक्झरी असायची,
गावात एखाद्याकडेच
‘बाटाची’ चप्पल दिसायची…

राशनच्या दुकानावर
लोकं चकरा मारायचे
तवा कुठं वायरच्या पिशवीत
किलोभर साखर आणायचे…

खालच्या वर्गातून वर जाताना
पुस्तक जुनेच असायचे,
‘शुभंकरोती’आणि ‘बे एक बे’
घरोघरी पोर म्हणायचे…

सडा,सारवण,धुणं,भांडी
बायकांना तर आरामच नव्हता
ज्याच्याकडे ‘पाणी तापवायचा बंब ‘
तोच सगळ्यात श्रीमंत होता…

दिवाळीच्या फराळाला
सर्वांनी एकत्र बसायचं,
खऊट खोबऱ्याच्या तेलामध्ये वासाच तेल असायचं…

कशाचा ‘मोती’ साबण
अन कशाची ‘काजू कतली’?
माया, प्रेम एवढ होतं
की गोड लागायची वात्तड चकली…

भात, पोळी ,गोडधोड
सणासुदीला व्हायचे
पाहुण्याला गरम आणि
घरच्याला गार पोळी वाढायचे…

पिझ्झा ,बर्गर ,न्यूडल्स
आजकाल रूटीन असतं
गरीबीला लपवणं
फार कठिण असतं…

स्वयंपाक घरात आता सगळा
किराणा भरलेला असतो,
खाऊ घालायची वासनाच नाही
लोणच्याला बुरा दिसतो…

हल्ली आता प्रत्येकाचं
पॅकेज फक्त मोठं असतं,
दिवाळीच्या दिवशी सुद्धा
पॉश घर “भकास ” दिसतं…

का बर पहिल्यासारखे
पाहुणे आता येत नाहीत?
हसण्याचे आणि खिदळण्याचे आवाज कानावर येत नाहीत?

काय तर म्हणे आम्ही आता
‘हाय फाय’ झालो,
चार पैसे आल्यामुळे
पुरते वाया गेलो…

कशामुळे घात झाला
काहीच कळंत नाही,
एवढं मात्र खरं की
सुखं मिळंत नाही…

प्रगती झाली का अधोगती
काहीच कळेना?
कोणाला कोणाकडून
अजिबात प्रेम मिळेना…

अहंकार कुरवाळल्यामुळे
प्रेमाचे झरे आटायलेत
आणि आधार गमावल्यामुळं
” सायकियाट्रिक ” जवळचे वाटायलेत…

भ्रमामध्ये राहू नका
जागं व्हा थोडं,
नात्यांशिवाय माणसाचं
सुटत नसतं कोडं……….
(संकलित)