After exam results….

प्रिय आई बाबा ,

बारावीचा निकाल लागला . तुम्ही अनुत्तीर्ण झालात . हो . . तुम्हीच ! वर्षभर सगळ्यांना सांगत होतात न ?? या कार्ट्याची कसली परीक्षा ? परीक्षा तर आमची . . . !! माझे सगळे मित्र , मैत्रिणी खूप चांगल्या मार्कांनी पास झाले . कारण परीक्षा त्यांनी दिली होती . घरच्यांनी त्यांना फक्त आधार दिला होता . . आई बाबा हाच आधार ना तुम्ही मला परीक्षेच्या आधी दिलात ना आता देत आहात . . .

तुम्ही म्हणता तुमच्या सर्कल मध्ये तुमची मान माझ्यामुळे खाली गेली . आई तू म्हणतेस माझ्या मूळे तुझी मान खाली गेली . आई बाबा माझे पण एक सर्कल आहे . तुमच्या सारखेच . तिथे माझीही मान खाली गेली आहे याची जाणीव आहे का तुम्हाला ?? ९५ % , ९० % , ८८ % या सगळ्या गराड्यात ७० % टक्क्यांचे तुमचे बाळ एकटे आहे हे तुम्ही ‘नोटीस ‘ केलंय का कधी ??

बाबा दोन चार दिवसांनी माझे मार्क्स हा विषय मागे पडेल . तुम्ही तुमच्या सर्कल मध्ये रमाल . आई तुझ्या ग्रुप मधली गॉसिप संपली की एका किटी पार्टी नंतर तू तुझ्या सर्कल मध्ये बिझी होशील . अचानक मी या ‘मार्क ‘ वाल्यांपासून वेगळा होतोय माझे सर्कलच नाहीसे होतंय हे तुम्हाला कसे समजत नाहीये ?? अचानक सगळे मार्कवाले एकत्र झालेत आणि मी त्यांच्यात असून पण एकटा पडलोय कारण यापुढे त्यांच्या वाटा आणि विषय हे माझ्या पेक्षा वेगळे आहेत . . तुम्हाला कधीच समजून घ्यावसं वाटत नाही ?

गेले २ दिवस आपण बोलत नाही आहोत . . . माझ्या कमी मार्कांनी आपल्यात खूप दुरावा निर्माण केलाय . तुमच्या पेक्षा किंवा तुमच्या पेक्षा जास्ती स्वप्ने मीही पाहीली होती . अभ्यास केला होता , पण नाही पडले मार्क . . . तुमच्या लेखी ७० % म्हणजे अनुत्तीर्ण ना ? हो मी फेल आहे . . . गुण पत्रिकेत ७० % पडण्य पेक्षा तुमच्या नजरेत माझी झालेली शून्य किंमत मला जास्ती टोचते . . . हे तुम्हाला कधी कळेल ?? रागाने तुम्ही माझ्या ११-१२ वी साठी झालेल्या खर्चाचा हिशेब माझ्यासमोर टाकून या मार्कांसाठी ओतला का इतका पैसा म्हणून जाब विचारलात . . . या प्रश्नाचे उत्तर मी काय देऊ ??

आई बाबा मला मार्क कमी पडले याचे दुक्ख , गिल्ट मला तुमच्या पेक्षा जास्ती आहे . . मी एकटेपणात आणि या गिल्ट मध्ये गुरफटत आहे . . मला जवळ घेऊन बाळ का कमी मार्क पडले असं विचाराल का ?? मला खूप रडायचं आहे . . . मला थोडं जवळ घ्याल का ?? आज मला मार्क कमी पडलेत म्हणून माझा वाटणारा तिटकारा , घरी होणारी धुसफूस , टोमणे यातून आपण एकमेकांपासून किति दूर जात आहोत . . .

कालांतराने १२ चे मार्क मागे पडतील . पण या प्रसंगात आलेली कटुता मागे पडेल का आई ?? ज्या वेळी मला तुमची सगळ्यात गरज आहे तेव्हा मला तुम्ही कोठेच दिसत नाही आहात . . . अशा वेळी मला आपल्या कामवाली च्या मुलाचे कौतुक वाटते . बिचारी प्वार फास झालं म्हणून पेढे द्यायला येते . . . बाबा तुमच्या माझ्या मधलं नातं या टक्क्यांवर आधारित आहे का ??

Just think about it…..