आर्थिक स्टॅबिलिटी मिळवताना
बरच गणित चुकत जातं,
नसण्यातच आनंद असतो
शेवटी उत्तर हाती येतं…
लहानपणी शाळेमध्ये
एकच ‘पोशाख’ असायचा
खाकी चड्डी पांढरा सदरा
प्रत्येकाच्या अंगावर दिसायचा…
पायात चप्पल असणं
ही लक्झरी असायची,
गावात एखाद्याकडेच
‘बाटाची’ चप्पल दिसायची…
राशनच्या दुकानावर
लोकं चकरा मारायचे
तवा कुठं वायरच्या पिशवीत
किलोभर साखर आणायचे…
खालच्या वर्गातून वर जाताना
पुस्तक जुनेच असायचे,
‘शुभंकरोती’आणि ‘बे एक बे’
घरोघरी पोर म्हणायचे…
सडा,सारवण,धुणं,भांडी
बायकांना तर आरामच नव्हता
ज्याच्याकडे ‘पाणी तापवायचा बंब ‘
तोच सगळ्यात श्रीमंत होता…
दिवाळीच्या फराळाला
सर्वांनी एकत्र बसायचं,
खऊट खोबऱ्याच्या तेलामध्ये वासाच तेल असायचं…
कशाचा ‘मोती’ साबण
अन कशाची ‘काजू कतली’?
माया, प्रेम एवढ होतं
की गोड लागायची वात्तड चकली…
भात, पोळी ,गोडधोड
सणासुदीला व्हायचे
पाहुण्याला गरम आणि
घरच्याला गार पोळी वाढायचे…
पिझ्झा ,बर्गर ,न्यूडल्स
आजकाल रूटीन असतं
गरीबीला लपवणं
फार कठिण असतं…
स्वयंपाक घरात आता सगळा
किराणा भरलेला असतो,
खाऊ घालायची वासनाच नाही
लोणच्याला बुरा दिसतो…
हल्ली आता प्रत्येकाचं
पॅकेज फक्त मोठं असतं,
दिवाळीच्या दिवशी सुद्धा
पॉश घर “भकास ” दिसतं…
का बर पहिल्यासारखे
पाहुणे आता येत नाहीत?
हसण्याचे आणि खिदळण्याचे आवाज कानावर येत नाहीत?
काय तर म्हणे आम्ही आता
‘हाय फाय’ झालो,
चार पैसे आल्यामुळे
पुरते वाया गेलो…
कशामुळे घात झाला
काहीच कळंत नाही,
एवढं मात्र खरं की
सुखं मिळंत नाही…
प्रगती झाली का अधोगती
काहीच कळेना?
कोणाला कोणाकडून
अजिबात प्रेम मिळेना…
अहंकार कुरवाळल्यामुळे
प्रेमाचे झरे आटायलेत
आणि आधार गमावल्यामुळं
” सायकियाट्रिक ” जवळचे वाटायलेत…
भ्रमामध्ये राहू नका
जागं व्हा थोडं,
नात्यांशिवाय माणसाचं
सुटत नसतं कोडं……….
(संकलित)