आज २९ ऑगस्ट, ध्यान चंदचा जन्मदिवस भारताचा राष्ट्रीय खेळ दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानिम्मित ध्यानचंदची एक गोष्ट.
१९३६, ध्यानचंद- हिटलर भेट
पारतंत्र्यात खितपत पडलेल्या बहुसंख्य हिंदुस्थानी जनतेकरिता कुठल्याही वर्षातील एखाद्या सामान्य दिवसा प्रमाणेच हाही एक दिवस होता.
परंतु हॉकी या खेळामध्ये जागतिक स्तरावर याच दिवशी भारताचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवले जाणार होते.
त्या वर्षीचे जागतिक ऑलीम्पिक खेळ जर्मनीत साजरे होत होते. स्वत:च्या मनगटाच्या जोरावर हिंदुस्थानी चमू अंतिम फेरीपर्यंत पोहोचला होता.
आता गाठ होती बलाढ्य जर्मन संघाशी.
त्यांचीच खेळपट्टी, त्यांचाच देश आणि त्यांचेच प्रेक्षक.
शिवाय जर्मनीचा सर्वेसर्वा अडॉल्फ हिटलर आपल्या टीमला उत्तेजन देण्यासाठी स्वत: जातीने हजर असणार, असे कळले होते.
याप्रमाणे जर्मन खेळाडूं करिता सर्व परिस्थिती अत्यंत अनुकूल होती आणि त्यामुळे त्यांना आणखी एक सुवर्ण पदक खिशात टाकल्यासारखेच वाटत होते.
खेळाला सुरुवात झाली.
मैदानाच्या मध्यभागी चरखा असलेल्या तिरंग्याला आपल्या खेळाडूंनी वंदन केले
आणि वंदे मातरम् या गीताचे गायन केले.
स्टेडीयम प्रेक्षकांनी खचाखच भरले होते. फ्युरर आणि त्याचे अनेक सेनापती प्रेक्षकांत बसलेले दिसत होते.
पहिल्या अर्ध्या वेळाचा खेळ संपला, तेव्हा एका गोलने हिंदुस्थानची सरशी झालेली होती.
जर्मनीची बलाढ्य टीम एकही गोल करू शकली नव्हती.
दुसऱ्या भागाच्या खेळाला सुरुवात झाली. परंतु आता हिंदुस्थानी खेळाडू मैदानावर घसरून सटासट पालथे पडू लागले;
कारण पहिल्या भागातील हिंदुस्थानी खेळाडूंचा आवेशपूर्ण आणि चपळ खेळ बघून जर्मन कोचच्या पोटात गोळा आला आणि आता पराभव अटळ आहे, हे त्याने ओळखले.
मधल्या वेळात जर्मन कोचने मैदानात सर्वत्र पाणी शिंपडण्याची व्यवस्था केली.
हिंदुस्थानी खेळाडू कॅन्व्हासचे निकृष्ठ दर्जाचे सामान्य बूट घालून खेळत होते.
ओल्या मैदानात ते एकेक करून भुईसपाट होऊ लागले.
जर्मन खेळाडूंचे बूट उत्कृष्ठ दर्जाचे होते व त्यामुळे ओल्या मैदानाचा त्यांच्या खेळावर फारसा परिणाम झाला नाही.
सामना हिंदुस्थानी खेळाडूंच्या हातून निसटतो की काय, असे वाटू लागले.आपल्या संघाचे नेतृत्व करीत होता ध्यान चंद.
आपला खेळ का खराब होत आहे, हे त्याच्या लगेच लक्ष्यात आले.
त्याने कॅन्व्हासचे बूट काढून फेकून दिले आणि अनवाणीच खेळायला सुरुवात केली.
ध्यान चंदने जबरदस्त चढाई सुरू केली आणि क्षणार्धात खेळाचा रंग पालटला.
आठास एक असा आपण सामना जिंकला.
आठांपैकी सहा गोल तर ध्यान चंदनेच लगावले होते.
जर्मन चमूची जर्मनीतच जर्मन प्रेक्षकांसमोर नाचक्की झाली.
सुवर्ण पदक हिंदुस्थानने हिसकावून घेतले.
हिटलरला आपल्या टीमचा पराभव सहन झाला नाही.
तो आणि त्याचे सेनापती पाय आपटीत क्रुद्ध होऊन स्टेडीयममधून चालते झाले.
त्याच दिवशी सायंकाळी हिटलरच्या कचेरीतून तातडीचा संदेश आला.
फ्युररने ध्यान चंदला भेटीसाठी बोलाविले होते.
ध्यान चंद आणि इतर हिंदुस्थानी खेळाडू अत्यंत अस्वस्थ झाले.
जर्मनीचा ऑलीम्पिक हॉकीमधील पराभव हिटलरला फार लागून राहिला आहे, हे सर्वांनाच माहीत होते.
जखमी सिंहाच्या गुहेतून ध्यान चंद सुखरूप माघारी येईल की नाही, याची सर्वांनाच काळजी वाटत होती.
त्या रात्री कोणालाच नीट झोप लागली नाही.
दुसऱ्या दिवशी सकाळीच ध्यान चंदला हिटलरसमोर उभे करण्यात आले.
सव्वापाच फूट उंचीच्या आणि किरकोळ शरीरयष्टीच्या त्या तरुणाला बघून फ्युररला नवल वाटले.
त्याने ध्यान चंदच्या भिकार कॅनव्हास बुटांकडे एक नजर टाकली आणि गुर्मीतच विचारले:
‘हे तरुण माणसा, तू हॉकी तर उत्तमच खेळतोस.
पण त्याशिवाय आणखी काही काम करतोस का?’
‘होय सर, मी हिंदुस्थानी सैन्यात आहे’,
ध्यान चंद म्हणाला.
हिटलर: ‘सैन्यात तू कोणत्या पदावर आहेस?’.
‘लान्स नाईक, सर’, ध्यान चंद उत्तरला.
‘सोडून दे इंडियन आर्मी, सोडून दे हिंदुस्थान आणि जर्मन नागरिक हो. आमच्या बाजूने हॉकी खेळत जा. मी तुला जर्मन सैन्यात बडा अधिकारी बनवतो’: हिटलर.
हिटलरचे हे बोलणे ऐकून ध्यान चंद बुचकळ्यात पडला.
मातृभूमीला अंतर देण्याची कल्पनाही त्याला सहन होणे शक्य नव्हते.
तो सच्चा देशभक्त होता. परंतु हिटलरचा प्रस्ताव नाकारणे म्हणजे प्रत्यक्ष यमधर्माला आव्हान देणे होय, हे त्याला माहीत होते. पण तो सच्चा सैनिक मरणाला घाबरत नव्हता. त्याने शुद्ध हिंदी भाषेत उत्तर दिले: ‘क्षमा असावी, सर.
ते शक्य नाही.
माझे माझ्या मातृभूमीवर प्राणापलीकडे प्रेम आहे’.
(या ठिकाणी मला संभाजी महाराजांनी औरंगजेबाला दिलेले सडेतोड उत्तर आठवते: ‘स्वधर्मे मरणम् श्रेय: | परधर्मो भयावह: || ).
हे सर्व होत असताना हिटलरचे अनेक सैनिकी अधिकारी तेथे होते.
उद्दामपणे हिटलरला नकार देणाऱ्या या तरुणाचे आता काय होणार, या विचाराने ते अस्वस्थ झाले.
परंतु हिटलर इतकेच म्हणाला:
‘जा, पड खितपत. तुझी मर्जी’.
नंतर हिटलर खाडखाड बूट वाजवत निघून गेला.
ध्यान चंदने पाठोपाठ तीन ऑलीम्पिक खेळांत (१९२८, १९३२ व १९३६) भारताला सुवर्ण पदके मिळवून दिली.
त्या कामगिरीकरिता पद्मभूषण हा सन्मान देऊन भारत सरकारने ध्यान चंदचा १९५६ साली सन्मान केला.