रागाला योग्य दिशा दिली तर….

रागावरती नियंत्रण करण्यास एक सुंदर उदाहरण —-
एका वकीलाच्या ऑफीसमध्ये संवाद –
“नेहमीप्रमाणे बसलो होतो. एक पक्षकार आले. हातात कागदाची पिशवी. रापलेला चेहरा. वाढलेली दाढी. मळलेली कपडे. म्हणाले.. सगळ्या च जमीनीवर स्टे लावायचा आहे. आणखी काय कागदं पाहीजेत? किती खर्च येईल?
मी त्यांना बसायला सांगितल. ते
खुर्चीवर बसले. त्यांची सर्व कागदपञे तपासली. त्यांच्याकडून माहीती घेतली. अर्धा पाउण तास गेला. मी त्यांना सांगितलं. मी अजून कागदपञे पाहतो. तुमच्या केसचा विचार करूया. तुंम्ही असं करा ४ दिवसांनी परत या.
४ दिवसांनी ते पक्षकार पुन्हा आले. तसाच अवतार. भावा बद्दलचा राग अजूनही कमी झाला नव्हता.मी त्यांना बसायची खूण केली. ते बसले.
मग मीच बोलायला सुरूवात केली. मी तुमची कागदपञे पाहीली.
तुंम्ही दोघे भाव. एक बहीण. आई वडील लहानपणीच गेले. तुमच शिक्षण ९ वी पास. धाकला भाव M.A.B.ed. तुंम्ही भावाच्या शिक्षणासाठी शाळा सोडली. रानात लंगोटीवर राबला. नेव्रा दाजीच्या हीरीवर दगड फोडली. सदाबापूच्या उसात च-या पाडल्या. पण भावाच्या शिक्षणाला पैसा कमी पडू दिला नाही.
एकदा बहीण शेतात गुरं चारत होती. तुमचा भाऊ शाळेतून आला होता. कसा तो म्हशीच्या आडवा गेला आणि त्याच्या अवघड जागी शिंग लागलं. चड्डी रक्तबंबाळ झाली. तुंम्ही खांद्यावरून त्याला बोरगावला नेलं. खर म्हणजे त्यावेळी तुमचं पण कळत वय नव्हत….फक्त कळती माया होती.. आई बापाच्या मागं यांचा मीच आई बाप ही भावना होती…
तुमचा भाव B.A ला गेला. उर भरून आला. तुंम्ही पुंन्हा जोमानं कष्ट उपसायला लागला. पण अचानक त्याला किडनीचा ञास सुरू झाला. दवाखानं केल..बाहेरचं केलं..पण गुण आला नाही..शेवटी डॉक्टरनं किडनी काढायला सांगितली.
तुंम्ही तुमची किडनी दिली.
हापीसर झाल्यावर खुप फिरायच आहे..नोकरी करायची आहे..तुला आमच्यापेक्षा लय ञास.. आंम्ही रानातली माणसं. आंम्हाला एक किडनी असली तरी चालतय.तुंम्ही बायकोच सुध्दा न ऐकता किडनी दिली.
भाव M.A ला गेला. होस्टेलवर रहायला गेला. गावात मटण पडलं..डबा नेवून द्यावा. शेतात कणसं आली..कणस नेवून द्यावी. कुठला सण आला.. पोळ्यांचा डबा द्यावा..घरापासून हॉस्टेलच अंतर २५ की.मी. पण तुंम्ही सायकलने गेला. घासातला घास घातला.
भावाला नोकरी लागली.. तुंम्ही गावात साखर वाटली..
३ वर्षीपुर्वी त्याचं लग्न झालं ..झालं म्हणजे त्यानंच केल. तुंम्ही फक्त हजर होता. पण तरी अभिमान होता..
भावाला नोकरी लागली. भावाच लग्न झालं..आता तुम्हाला आणि बायकापोरांना सुख लागणार होतं; पण झाल उलटच….
लग्न झाल्यापासुन भाव घरी येत नाही..बोलावलं तर म्हणतो; मी बायकोला शब्द दिलाय.. घरी पैसा देत नाही..विचारलं तर म्हणतो अंगावर कर्ज आहे.. गेल्यावर्षी कोल्हापुरात फ्लॅट घेतला. विचारल तर म्हणतो कर्ज काढून घेतलाय..
सगळ सांगून झाल्यावर मी थोडावेळ थांबलो.
नंतर म्हणालो …आता तुमचं म्हणण आहे की त्याने घेतलेल्या मिळकतीवर स्टे लावायचा ?
तो पटकन म्हणाला; हो बरोबर…
मी म्हणलं; स्टे लावता येईल. भावाने खरेदी केलेल्या मिळकतीमधला हिस्सापण मिळेल. पण……
पण तुंम्ही दिलेली कीडनी परत मिळणार नाही. तुंम्ही भावासाठी आटवलेलं रक्त परत मिळणार नाही. तुंम्ही त्याच्यासाठी खर्च केलेलं आयुष्यपण परत मिळणार नाही..आणि मला वाटतयं या गोष्टीपुढं त्यानं घेतलेल्या फ्लॅटची किंमत शुन्य आहे.
त्याची नियत बदलली. तो त्याच्या वाटंनं गेला. तुंम्ही त्याच वाटनं नको जाऊसा. तो भिकारी निघाला..तुंम्ही दिलदार होता.. दिलदारच रहा.. तुंम्हाला काहीएक कमी पडणार नाही.. उलट मी म्हणेन वडीलोपार्जित मिळकतीमधला तुमचा हिस्सा तेवढा पेरा..त्याचा हिस्सा पडीक राहुद्या.. कोर्ट कचेरी करण्यापेक्षा मुलांना शिकवा..शिकुन तुमचा भाव बिघडला ; म्हणुन पोरं बिघडणार नाहीत..
त्यान १० मिनीटं विचार केला.. सगळी कागद पिशवीत कोंबली.. डोळं पुसत म्हणाला; चलतो सायेब..
या गोष्टीला ५ वषॅ झाली. परवा तो पक्षकार अचानक ऑफीसला आला. बरोबर गोरागोमटा पोरगा. हातात कसलीतरी पिशवी.मी म्हणल बसा..तो म्हणाला , ‘बसायला न्हाय आलो सायेब, पेढं द्यायला आलोय’.
हा माझा पोरगा. न्युझिलॅंन्डला असतो. काल आलाय. आता गावात ३ मजली घर हाय. ८-९ एकर शेत घेतलय. तुंम्ही म्हणाला होता कोर्ट कचेरीच्या वाटला लागु नका.
मी पोरांच्या शिक्षणाची वाट धरली..
मला भरुन आलं… हातातला पेढा हातातच राहीला…”
रागाला योग्य दिशा दिली तर पुन्हा रागवायचि वेळ येणार नाही.

 

One more what’s up post…………….

Again not sure about the person who wrote it. Salute to that writer….

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *