Steve Jobs Last words




स्टीव्ह जॉब्जचे अखेरचे शब्द –

व्यावसायिक क्षेत्रात मी उत्तुंग यशाची शिखरं गाठली…
इतरांच्या दृष्टीकोनातून माझं आयुष्य आणि यश हे समानार्थी शब्दही झाले…

तरीही, माझ्या कामाव्यतिरिक्त, आनंद जर म्हणाल तर तो मला क्वचितच मिळाला. अखेरीस काय तर, ज्याला मी सरावून गेलो ती माझी संपत्ती माझ्यासाठी केवळ एक सत्यपरिस्थितीमात्र बनून राहीली.

आज या क्षणी, आजारपणामुळं अंथरूणाला खिळलेलं असताना मी माझं सारं आयुष्य आठवून पहातोय. ज्या प्रसिद्धी आणि संपत्तीला मी सर्वस्व मानलं आणि त्यातच वृथा अहंकार जपला ते सगळंच आज मृत्युद्वारी उभं असताना धूसर होत असल्याचं आणि म्हणूनच निरर्थकही असल्याचं मला प्रकर्षानं जाणवतंय.

आज क्षणाक्षणानं मृत्यु जवळ येत असताना, हिरवा प्रकाश दाखवणारी अन् आयुष्यमान वाढवणारी वैद्यकीय उपकरणं माझ्या अवतीभवती दिसत असताना, त्यात असलेल्या यंत्रांचा ध्वनीही मला ऐकू येत असताना, निकट येत असलेल्या मृत्युदेवतेचा श्वासोच्छवासही मला जाणवतोय…

आता माझ्या लक्षात आलंय, भविष्यासाठी पुरेल एवढी पुंजी साठवून झाल्यानंतर, संपत्तीव्यतिरिक्त इतर काहीतरी अधिक महत्वाचं आपण करायला हवं असतं:
त्यात कदाचित् नातीगोती जपणं किंवा एखाद्या कलेसाठी वेडं होऊन जाणं किंवा तारूण्यात पाहिलेल्या एखाद्या स्वप्नाचा पाठपुरावा करणं असं काहीतरी असू शकतं…

सातत्यानं केवळ धनसंचयाच्याच मागे धावण्यामुळे माणूस ‘आतून’ फक्त आणि फक्त पिळवटतच जातो…अगदी माझ्यासारखा…

परमदयाळू परमेश्वरानं आपल्या प्रत्येकाला इंद्रियं दिलीयेत ती इतरांच्या अंत:करणातल्या प्रेमाची जाणिव व्हावी यासाठीच…संपत्तीनं निर्माण होत असलेल्या आभासांच्या आकलनासाठी निश्चितच नव्हे.

आयुष्यभर मी जी संपत्ती, मानमरताब कमावले ते मी कदापिही सोबत नेऊ शकणार नाही…केवळ प्रेमामुळे माझ्या आयुष्यात निर्माण झालेल्या सुखद स्मृती मात्र नक्कीच नेऊ शकेन.

तिच तर खरी संपत्ती…जी आपल्यासोबत येते, आपली पाठराखण करते, आपल्याला बळ देते आणि अंती मार्गदर्शन करेल असा आपल्यापुरता प्रकाशकिरणही देऊ करते.

हजारो मैल विनासायास प्रवास करण्याची शक्ती प्रेमामधे आहे आणि त्यासोबतीनं येणारं जगणंही मग अमर्याद होऊन जातं.

हवं तिथे जा…हवी ती उंची गाठा. हवं ते प्राप्त करण्याची क्षमता आपलं ह्रदय आणि या दोन हातांमधे असते.

जगात सगळ्यात महागडा बिछाना कोणता असतो ते ठाऊक आहे?…”आजारपणाचा बिछाना” …

आपली गाडी चालवण्यासाठी चालक भाड्यानं मिळतो, आपल्यासाठी पैसे कमावून देणारे कर्मचारीही नोकरीला ठेवता येतात…पण आपलं आजारपण सहन करण्यासाठी आपण इतर कोणालाही-कधीही नेमू शकत नाही.

हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात. पण एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही…आणि ती असते “आपलं आयुष्य”.

शस्त्रक्रीयेच्या टेबलावर असलेल्या व्यक्तीच्या मनात ‘आपलं केवळ एकच पुस्तक वाचायचं राहिलंय’ ही जाणिव असते…ते पुस्तक असतं “निरोगी जगण्याचं पुस्तक”.

सध्या तुम्ही आयुष्याच्या कोणत्याही स्थितीतून-वयातून जात असलात तरीही, एक ना एक दिवस काळ अश्या वळणावर आणून उभं करतो की समोर नाटकाचा शेवटचा अंक लख्खपणे दिसू लागतो.

सर्वांवर प्रेम उधळत जा…

स्वत:कडे दुर्लक्ष करू नका…स्वत:च स्वत:चा आदर ठेवा. इतरांनाही आदराने व प्रेमानं वागवा.